मुंबई : नाशिकमध्ये झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीतून गळती झाल्याने 22 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. या दुर्घटनेमुळे नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेचा तपास व दोषींवर कारवाई करण्यासाठी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली सात जणांची उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली.
डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयातील घटनेचा तपास व दोषींवर कारवाई करण्यासाठी सात जणांची समिती गठित करण्यात आली आहे. सदर समिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे अध्यक्षतेखाली गठित करण्यात आली असून या समितीत एकूण सात सदस्य असणार आहेत. यामध्ये आरोग्य उपसंचालक डॉ.पी.डी.गांडाळ, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. प्रमोद गुंजाळ, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्त माधुरी पवार, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य ज्ञानदेव नाठे, महापालिकेचे अधिक्षक अभियंता संदीप नलावडे तसेच ऑक्सिजन पुरवठ्याच्या बाबतीत संपूर्ण राज्यात स्वयंसेवक म्हणून सेवा देणारे हर्षल पाटील यांचा या समितीमध्ये समावेश असून सदर समिती संपूर्ण घटनेचा तपास करणार असल्याचे, टोपे यांनी सांगितले.
घटनेच्या चौकशीसाठी गठित करण्यात आलेल्या समितीद्वारे घटनेची सविस्तर अहवाल शासनाला सादर करण्यात येईल.तसेच दुर्घटनेसाठी कारणीभूत असलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची ग्वाही आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली.
दरम्यान, या दृर्घटनेत मृत पावलेल्या रुग्णांच्या वारसांना राज्य शासनाकडून पाच लाखाची मदत देण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.