अमरावती : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून नवनीत राणा यांना अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्याआधी नवनीत राणा यांनी आपल्या स्वाभिमान युवा पक्षातून राजीनामा दिला आहे. त्यानंतर राणा यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राणा आता कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवतील हे आता स्पष्ट झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून नवनीत राणा या भाजपच्या कमळावर निवडणूक लढतील अशा चर्चा होत्या. काल अखेर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नवनीत राणा यांना महायुतीतील शिंदे गटाचे नेते आंनद अडसूळ आणि अपक्ष आमदार बच्चु कडू यांनी विरोध केला आहे. त्यामुळे आता अडसूळ आणि कडू महायुतीचा धर्म पाळतात का ? ते पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राणा यांनी भाजपचे आभार मानले आहेत. त्या म्हणाल्या की, माझ्यावर विश्वास दाखवून उमेदवारी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जाहीर आभार व्यक्त करते. अमरावतीच्या लोकांनी मला इथपर्यंत आणलं. अमरावतीची जनता नेहमी विकासासोबत राहिली आहे. मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मी मनापासून धन्यवाद देते.