मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुका अवघ्या दीड वर्षांवर येऊन ठेपल्या असताना, आता सर्वच पक्षांकडून नियोजन केले जात आहे. महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी केली जात आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र बीएमसीची निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्याकडे सोपविली जाण्याचे संकेत दिले आहेत. सुप्रियाताई सुळे आणि रोहित पवार यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत लक्ष घातले तर त्याचा पक्षाला नक्कीच फायदा होईल, असे मत नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.
नवाब मलिक म्हणाले की, कोरोनामुळे काहीकाळ पक्षबांधणीमध्ये खंड पडला होता. मात्र आता पुन्हा एकदा निवडणुकीच्या दृष्टीने आमचा धडका सुरू होईल.
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी महापालिका निवडणूक एकत्र लढवली तर याचा नक्कीच फायदा होईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. सोबतच, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यभर एक लाख लोकांना रोजगार मिळावा यादृष्टीने ऑनलाईन मोहिम हाती घेतली जाईल, त्याचे रजिस्ट्रेशन व मुलाखती 12 डिसेंबरपासून सुरू होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.