मुंबईत अतिवृष्टी सुरू असतानाही कर्तव्य चोखपणे बजावणाऱया मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक करतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सूचकपणे अमृता फडणवीस यांच्यावर ट्विटद्वारे निशाणा साधला आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येच्या तपासाबद्दल मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल काही प्रश्न उपस्थित करून शंका व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर सुळे यांनी मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक करताना सूचकपणे अमृता फडणवीस यांच्या ट्विटचा समाचार घेतला आहे.
सुशांतसिंग राजपूत यांनी केलेल्या आत्महत्येच्या तपासावरून सध्या वादंग सुरू आहे. बिहार पोलिस आणि महाराष्ट्र पोलिस यांच्यात त्यात जुंपली आहे. या पाश्वर्भूमीवर सुळे यांनी गुरुवारी ट्विट केले. त्यात मुंबईत अतिवृष्टी सुरू असताना, वाहतूक नियमन करणाऱया एका पोलिसाचे पाठमोरे छायाचित्र त्यांनी त्यात समाविष्ट केले आहे. आपली मुंबई सुरक्षित आहे ही मुंबई पोलिस तुम्ही बजावत असलेल्या कर्तव्यामुळेच…तुमच्या या मानवी मूल्ये जपणाऱया सेवाभावास सॅल्यूट, असे सुळे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
आपली मुंबई सुरक्षित आहे ही @MumbaiPolice तुम्ही बजावत असलेल्या कर्तव्यामुळेच…तुमच्या या मानवी मूल्ये जपणाऱ्या सेवाभावास सॅल्यूट…
Salute🙏🏻 pic.twitter.com/5LW0b0G9Gd
— Supriya Sule (@supriya_sule) August 6, 2020
कौतुक करणाऱ्या सुळे यांच्या ट्विटला नेटिझन्सनेही मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला. सुमारे पाच तासांत सुमारे 419 जणांनी ते ट्विट रिट्विट केले तर, तब्बल सुमारे साडेपाच हजार नेटिझन्सने त्या ट्विटला पसंती दर्शविली आहे.