अहमदनगर : शेतकरी आंदोलनाला पाकिस्तान आणि चीनकडून मदत मिळत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले होते. दानवें यांच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.
सातत्याने जर सर्वसामान्य लोकांच्या विरोधात हे विरोधक बोलत राहिले, तर आम्हीसुद्धा त्या ठिकाणी शांत राहणार नाही, असा इशाराच आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दानवेंना दिला आहे.
रोहित पवार म्हणाले की, शेतकरी स्वतःच्या हितासाठी लढत आहेत, जर त्याला तुम्ही भारताच्या बाहेरून पाकिस्तान आणि चीनमधून काही जण येऊन या लोकांना प्रेरित करतात, असं म्हणत असाल, तर तुमची विचारसरणी त्या ठिकाणी तुम्ही दाखवून देत आहात.
दावने यांच्यासारख्या विरोधी पक्षातील अनेक नेत्यांच्या वक्तव्यांची हल्ली कोणी फारशी दखल घेत नाही. मात्र, दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल पुन्हा असे वक्तव्य केले तर मात्र आम्ही विरोधक म्हणून नाही तर राजकारणाबाहेर जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या माध्यमातून योग्य ते उत्तर देऊ, असे म्हणत रोहित पवार यांनी दावनेंवर निशाणा साधला.