राज्यात अनलॉक सुरू झाल्यानंतर विविध गोष्टी टप्प्याटप्प्यानं सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, जिम अजूनही बंद आहेत. त्यामुळं जिम चालक आर्थिक अडचणीत आले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडं जिम सुरु करण्याला परवानगी देण्याची मागणी केली आहे.
या आधी देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जिम चालकांना थेट जिम सुरु करा असे आवाहन केले होते. तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील जिम सुरु करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी एका जिम चालकाने लिहिलेले पत्र ट्विट करत मुख्यमंत्र्यांकडे जिम सुरु करण्याची मागणी केली आहे.
‘जिम, हेल्थ क्लब, व्यायामशाळा यावर उपजिविका असलेल्या सर्वांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. लॉकडाऊन असले तरी जागामालक भाड्यासाठी, बँकवाले हप्त्यांसाठी पैसे मागत असल्याची बाब या पत्रामध्ये जिम चालकांनी नमूद करून जिम सुरु करण्याची मागणी केली आहे.
कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर राज्यातील जीम बंद करण्यात आल्या आहेत.परंतु आता अनलॉक ची प्रक्रिया सुरु असल्याने जीम पुन्हा सुरु करणे आवश्यक आहे. @CMOMaharashtra राज्यातील अनेक जीम चालकांनी यामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. pic.twitter.com/cWL9eXGfLr
— Supriya Sule (@supriya_sule) August 19, 2020