मुंबई : राज्याचा आरोग्य सुविधांवरचा खर्च महामारीमुळे वाढलेला आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेवर देखील लॉकडाऊनमुळे परिणाम झाला आहे. तसेच लॉकडाऊनमुळे राज्याचा महसूल देखील कमी झाला असताना, राज्य सरकारने नागरिकांच्या हितासाठी मोफत लसीकरणाचा निर्णय घेऊन राज्याच्या तिजोरीवर ताण दिला आहे.
या पार्श्वभूमीवर शुक्रवारी महाराष्ट्र काँग्रेसनं महत्त्वाचा निर्णय घेत, राज्यातील सर्व ५३ आमदारांचं एक महिन्याचं वेतन, मुख्यमंत्री सहाय्य्यता निधीत जमा केलं. तसेच, स्वतः महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील, त्यांचं एका वर्षाचं संपूर्ण वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करणार असल्याचं सांगत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून देखील ५ लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला दिली जाणार असल्याची माहिती दिली.
त्याचप्रमाणे आपल्या सत्ताधारी मित्र पक्षाच्या पाऊलावर पाऊल टाकत, राष्ट्रवादी काँग्रेसने देखील, राज्यातील आपल्या सर्व आमदार आणि खासदारांचे एक महिन्याचे वेतन मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणार असल्याची घोषणा केली आहे. याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून १ कोटी रुपयांची स्वतंत्र मदत देण्याचं जाहीर करण्यात आली आहे. स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस सर्वेसर्वा शरद पवार यांनीच याबाबतची चिट्ठी, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर स्वतः लिहून, यासंदर्भात पक्षाला सूचना केली होती.
“आमदार-खासदारांचं एक महिन्याचं वेतन करोना संदर्भात मृत्यूमुखी पडलेल्यांसाठी, राज्यातील आरोग्य सेवा, पोलीस दल, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आपल्या पक्षामार्फत द्यावे. तसेच, आपल्या पक्षामार्फत एक कोटी रुपये राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टतर्फे देण्यात यावेत. श्री टकले व्यवस्था करतील”, अशी नोट शरद पवार यांनी दिली होती. त्यानुसार राष्ट्रवादी पक्षाकडून १ कोटी रुपयांच्या निधीचा चेक देण्यात आला असून त्यासोबतच आमदार-खासदार आपलं महिन्याभराचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देतील”, असं परिपत्रक देखील पक्षाकडून काढण्यात आलं आहे.