रायगड : ऐन लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर रायगड जिल्ह्यात महायुतीमधील विसंवाद चव्हाट्यावर आले होते. भाजपने सुनील तटकरे यांच्या विरोधात जोरदार मोहीम राबवली होती. रायगड जिल्ह्यातून सुनील तटकरेंना उमेदवारी नकोच, म्हणणाऱ्या भाजपने आता त्यांच्याच प्रचारासाठी जोर लावला आहे. तटकरेंना मत म्हणजेच नरेंद्र मोदींना मत म्हणत प्रचाराचा धुरळा उडवला आहे. पेण येथील देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारसभेच्या निमित्ताने राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये दिलजमाई झाली.
भाजपचे कोकण संघटक म्हणून जाबाबदारी पाहणाऱ्या सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे पक्ष निरीक्षक असलेल्या गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे भाजपच्या धैर्यशील पाटील यांनाच उमेदवारी द्या अशी मागणी केली होती, त्याचवेळी तटकरेंना उमेदवारी देण्यास विरोध केला होता. मात्र ही मागणी फेटाळून पक्षश्रेष्ठींनी सुनील तटकरे यांना महायुतीची उमेदवारी घोषित केली होती. त्यामुळे जिल्ह्यातील कार्यकर्ते नाराज होते. त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील प्रचारापासून दूर राहीले होते.
पण आता सुनील तटकरेंना असलेला भाजपचा विरोध मावळला आहे. भाजपचे नेते आणि कार्यकर्ते तटकरेंच्या प्रचारात उतरले आहे. तळपत्या उन्हात पेणच्या नगर परिषद मैदानावर झालेल्या या सभेला हजारोंची गर्दी जमवून भाजपने शक्ती प्रदर्शन केले. जिल्ह्यातील भाजपचे सर्व प्रमुखनेते या सभेला आवर्जून हजर होते. तटकरेंना मत म्हणजेच मोदींना मत अशी भूमिका सर्वांनी यावेळी मांडली. पेण मतदारसंघातून चांगले मताधिक्य देण्याची ग्वाही जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील आणि आमदार रवि शेठ पाटील यांनी दिली.
READ ALSO :
हेही वाचा…भाजपच्या मुंबईतील तीन खासदारांचा पत्ता कट, विरोधकांची जोरदार टिका
हेही वाचा…पुनम महाजनांचा पत्ता कट, भाजपकडून उज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर