पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक (२०२२) अत्यंत प्रतिष्ठेची होणार आहे. भाजपाला पराभवाची धूळ चारुन राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना २०१७ मधील पराभवाचा वचपा काढायचा आहे. मात्र, त्यासाठी आता शहर राष्ट्रवादीला नवीनच चेहरा हवा आहे. त्यासाठी पार्थ पवार यांच्या नेतृत्तवाखाली काम करणारा ‘राष्ट्रवादीचा कट्टर’ चेहरा आता बाहेर काढावा लगणार आहे.
सध्यस्थितीला शहरात भोसरीतील माजी आमदार विलास लांडे शहराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार लांडे यांच्या खांद्यावर जबाबदारी देण्यास उदासीन आहेत. कारण, लांडे यांनी २०१९ मध्ये पक्षाचे तिकीट नाकारले होते. पक्षात दुफळी माजायला लांडेच जबाबदार आहेत. अजित पवार त्यांना संधी देणार नाहीत, ही बाब लक्षात आल्यानंतर लांडे यांनी आपले निष्ठावंत नगरसेवक अजित गव्हाणे यांचे नाव पुढे केले आहे. शहराध्यक्ष अजित गव्हाणे झाले, तरी शहरातील पक्षावर कमांड लांडे यांचीच राहणार आहे.
मात्र, भोसरीत राष्ट्रवादीचा शहराध्यक्ष दिला, तर त्याचा फायदा राष्ट्रवादीला होणार नाही. उलटपक्षी, लांडे अथवा गव्हाणे शहराध्यक्ष झाल्यास चिंचवडमधील भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांना मोकळीक देण्यात येईल. कारण, जगताप आणि लांडे यांचे सख्य संपूर्ण शहराला माहीत आहे. विलास लांडे यांचे राजकारणाचा १९९२ पासूनचा आढावा घेतला, तर लांडेंचे राजकारण पक्षाला धरून कधीच नव्हते, हे लक्षात येते. त्यांच्यावर पक्षातील अद्यापही अनेकजण नाराज आहेत. एव्हाना, लांडे यांच्या कारभारामुळेच पक्षाची आज वाताहत झाली आहे. त्यामुळे लांडे किंवा गव्हाणे यांच्याकडे पक्षाची धुरा देण्याबाबत पक्षाच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची मानसिकता नाही. याचा फटका सर्वोतोपरी राष्ट्रवादीच्या महापालिका निवडणुकीतील कामगिरीवर होणार आहे.
सध्यस्थितीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राष्ट्रवादीसह महाविकास आघाडी म्हणून संपूर्ण राज्याची जबाबदारी सांभाळावी लागते. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे, असा सूर आहे. मात्र, अजित पवार यांच्या वतीने मावळ लोकसभा मतदार संघातील पक्षाचे उमेदवार राहिलेले पार्थ पवार यांनी शहरात लक्ष घातले आहे.
मावळ लोकसभा मतदार संघात शहरातील पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. त्यामुळे पार्थ पवार यांना २०२४ मधील निवडणुकीसाठी ताकद द्यायची असेल, तर सर्वप्रथम या दोन मतदार संघांवर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. भोसरीत शहराध्यक्षपद दिल्यास ते लांडे किंवा गव्हाणे यांपैकी एकाला द्यावे लागेल. लांडे आणि गव्हाणे हे अजित पवार यांच्या पट्टीतील नेते आहेत. त्यांच्याशी पार्थ पवारांना जुळवून घेता येणार नाही. दुसरीकडे, लांडे आणि गव्हाणे शहराध्यक्ष झाल्यास चिंचवड विधानसभेत डोकावूनही पहाणार नाहीत. कारण, भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचा रोष लांडे कदापि घेणार नाहीत.
याउलट, भाजपला धक्का द्यायचा असेल, तर राष्ट्रवादीला पहिले ‘टार्गेट’ चिंचवड विधानसभा ठेवावे लागेल. कारण, भाजपचे सर्वाधिक नगरसेवक चिंचवडमधून निवडून आले आहेत. चिंचवड मतदार संघातील नवीन चेहरा पक्षाचा शहराध्यक्ष म्हणून दिल्यास राष्ट्रवादीला फायदा होईल आणि पार्थ पवार यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्लॅटफॉर्म तयार होईल. चिंचवडमध्ये भाजप आमदार जगताप यांच्याविरोधात अनेक स्थानिक नगरसेवकांनी बंड केले आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी स्थानिक पण नव्या चेहऱ्याला संधी दिली, तर भाजपला चिंचवडमध्ये खिंडार पाडणे शक्य आहे. कारण, राष्ट्रवादीतील नवोदीत, भाजपा आणि शिवसेनेतील नाराजांची मोट पार्थ पवार बांधू शकतील, अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे.
त्यासाठी पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदार संघात पार्थ पवार यांनी आपला जम बसवला पाहिजे. आतापासून तयारी केल्यास मावळ जिंकण्यासाठी पार्थ पवार यांना सोईसकर होईल. विलास लांडे किंवा अजित गव्हाणे पार्थ पवार यांच्या विचाराने चालू शकत नाहीत. मावळ लोकसभा आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीचा नवा चेहरा म्हणून पार्थ पवारच हवा, असा कार्यकर्त्यांचा सूर आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवर पार्थ पवार यांच्या विचारांशी जुळवून घेणारा नवीन चेहऱ्याला शहराध्यक्षपदी संधी द्यावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.