मुंबई – केंद्रात ‘हेवीवेट’ मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणारे भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या मनात आजही ‘आपल्या मुख्यमंत्र्यां’विषयी स्नेह आहे. केंद्रीय रस्ते आणि महामार्ग विकास मंत्री नितीनजी गडकरी यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची मुंबईत भेट घेत ऋणानुबंध कायम असल्याचं दाखवलं.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी हे पक्षातर्फे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. राजकीय वर्तुळात मनोहर जोशींना प्रेम आणि आदराने ‘सर’ असे संबोधले जाते. राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून मनोहर जोशी वयोमानापरत्वे दूर झाले असले, तरी आजही दिग्गज नेत्यांशी त्यांचे घट्ट नाते आहे. मनोहर जोशी यांच्या निवासस्थानी नितीन गडकरी यांनी सदिच्छा भेट घेतली. गडकरींनी मनोहर जोशींच्या पाया पडून आशीर्वाद घेतले.
मनोहर जोशी हे 1995 ते 1999 या काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होते. जोशींच्या कार्यकाळात शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये नितीन गडकरी यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाची धुरा होती. पीडब्ल्यूडी मंत्री म्हणून मुंबई-पुणे महामार्गाच्या विकासात नितीन गडकरी यांचा महत्त्वाचा वाटा मानला जातो. या भेटीच्या निमित्ताने गडकरी-जोशींनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.