मुंबई : कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांचा वाढदिवस काल होता, यानिमित्ताने महाराष्ट्रभर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला आहे. सध्या कोरोनाकाळामुळे आमदार रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांना जल्लोष करता आला नाही, याबद्दल कार्यकर्त्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने महाराष्ट्रातील अनेक राजकीय मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण या सगळ्या घडामोडींमध्ये आता रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार यांनी वाढदिवसासंदर्भात एक भावनिक फेसबुक पोस्ट करून आई आणि मुलाच्या नात्यात किती गोडवा असतो हे दाखवून दिले आहे.
मला आता कुणाच्या ओळखीची गरज पडत नाही आज मला लोकं रोहित दादांची आई म्हणून ओळखतात. खरं सांगू तू माझा मुलगा असल्याचा सार्थ अभिमान आहे. आज तुझ्या वाढदिवसानिमित्त खूप खूप आशीर्वाद व शुभेच्छा. तू उत्तरोत्तर प्रगती करत राहा हीच देवाकडे प्रार्थना.!
नेमकं सुनंदा पवार यांनी काय म्हटलंय आपण ती पोस्ट जाणून घेऊया.
प्रिय रोहित,
थँकू, आज मला माझी स्वतःच्या किंवा दुसऱ्या कोणत्याही ओळखीची गरज पडत नाही, आज मला लोकं रोहित दादांची आई म्हणून ओळखतात. प्रत्येक, आई-वडिलांना त्याची मुलं मोठी व्हावी, मुलांच्या नावाने आई-वडिलांची ओळख व्हावी असे वाटते, तू ते आम्ही न सांगता पूर्ण करून दाखवलं.! शपथ विधीच्या वेळी ‘मी रोहित सुनंदा राजेंद्र पवार’ म्हणून केलेला माझा गौरव माझ्या मातृत्वाला सार्थ करतो. लहानपणी गड्या माणसात खेळता खेळता आज तू कधी एवढा मोठा माणूस झाला हे मला कळलंच नाही.मात्र, पदानेचं नाही तर इतकाचं तू मनाने ही मोठा आहे हे मी नाही संपूर्ण महाराष्ट्र सांगतो. रोहित, खरं सांगू तू माझा मुलगा असल्याचा सार्थ अभिमान आहे. आज तुझ्या वाढदिवसानिमित्त खूप खूप आशीर्वाद व शुभेच्छा. तू उत्तरोत्तर प्रगती करत राहा हीच देवाकडे प्रार्थना.!