नवी दिल्ली : देशात महामारीने बाधित होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. परिणामी देशाच्या आरोग्य यंत्रणेवर ताण पडत असून बेड्स, व्हेंटीलेटर्स, रेमेडीसीवर इंजेक्शन्स आणि इतर औषधे, लसींच्या बरोबरच ऑक्सिजनचा देखील तुटवडा जाणवत आहे. यामुळे रुग्णांचे हाल होत असून, अनेकांचा अपुऱ्या सोयी-सुविधांमुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच वाढत्या महामारीच्या संक्रमणामुळे मृत्यूदरातही वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केयर्स फंडातून एक लाख पोर्टेबल ऑक्सिजन कंन्सन्ट्रेटर खरेदी करण्यासाठी मंजुरी दिली आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली लिक्विड मेडिकल ऑक्सिजनच्या पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक पार पडली, या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला. यावेळी पंतप्रधानांनी पोर्टेबल ऑक्सिजन कंन्सन्ट्रेटर लवकरात लवकर खरेदी करून राज्यांना उपलब्ध करून देण्याचे निर्देश देखील दिले आहेत. महामारीचा अधिक प्रादुर्भाव झालेल्या राज्यांना यासाठी प्राधान्य दिलं जाणार आहे.
In addition to earlier sanctioned 713 PSA plants under PM Cares Fund, 500 new Pressure Swing Adsorption (PSA) oxygen plants sanctioned under PM CARES Fund.
PSA plants will augment the supply of Liquid Medical Oxygen at hospitals in district headquarters and Tier 2 cities: PMO— ANI (@ANI) April 28, 2021
तसेच, या बैठकीत पीएम केयर्स फंड अंतर्गत यापूर्वीच मंजुरी दिलेल्या ७१३ PSA प्लान्टपैकी ५०० नव्या ऑक्सिजन प्लांट्सनाही मंजुरी देण्यात आली आहे. पीएम केयर्स फंडद्वारे ५०० नवे ऑक्सिजन प्लांट उभारले जातील आणि त्यात ऑक्सिजनचं उत्पादन लवकरात लवकर सुरू करण्याचे प्रयत्नही केले जातील. हे प्लांट जिल्हा मुख्यालय आणि टिअर २ शहरांच्या रुग्णालयातील ऑक्सिजनचा पुरवठा वाढवतील. हे प्लांट DRDO आणि CSIR द्वारे विकसित करण्यात आलेल्या स्वदेशी तंत्रज्ञानाच्या मदतीनं स्थापन केले जातील.