पंढरपूर : 5 राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज हाती येणार आहे . यासोबतच आज महाराष्ट्रात पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीची देखील मतमोजणी होणार आहे. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर ही पहिलीच प्रत्यक्ष निवडणूक असल्याने सर्वांचेच याकडे लक्ष आहे.
या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होणार की भाजपचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सकाळी 8 वाजल्यापासून येथे मतमोजणी सुरू झाली असून, दुपारपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे.
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत एकूण 3 लाख 50 हजार 889 मतदार असून एकूण 524 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबवण्यात आली होती. ही निवडणूक राजकीय प्रचारसभा आणि नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे देखील विशेष चर्चेत राहिली होती.
या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके, तर भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्यात प्रमुख लढत असली तरीही, स्वाभिमानीचे सचिन शिंदे, अपक्ष शैला गोडसे, सिद्धेश्वर आवताडे यांच्यासह 19 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.