पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट येथे ऊस कामगारांच्या प्रश्नांवर महत्त्वाची बैठक झाली. यावेळी ऊस तोडणी कामगार, मुकादम आणि वाहतुकीच्या दरात सरासरी 14 टक्क्यांनी वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. मुख्य म्हणजे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या भगिनी भाजप नेत्या पंकजा मुंडे बैठकीत एकमेकांच्या बाजूला बसल्याचे पाहायला मिळाले.
एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक समजले जाणारे मुंडे भाऊ-बहिण हे ऊसतोड मजुरांना न्याय मिळवून देण्यासाठी एकत्र आल्याचे पाहण्यास मिळाले. तब्बल एक वर्षानंतर या बैठकीच्या निमित्ताने मुंडे भावंड समोरासमोर आली. पंकजा आणि धनंजय मुंडे शेजारी-शेजारी बसले होते. त्यावेळी दोघा भावा-बहिणींमध्ये काही संवादही झाला. एरव्ही एकमेकांवर सडकून टीका करणारे भाऊ-बहिण मजूरांसाठी एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला आले.
या बैठकीत पंकजा मुंडे यांनी ऊसतोड मजुरांच्या दरवाढीसंदर्भात मुद्दा मांडला. बैठकीनंतर देखील पत्रकारांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी फटकेबाजी केली. ऊस तोडणी कामगारांचे नेतृत्व महत्त्वाचे नाही. या कामगारांचे पालकत्व महत्त्वाचे आहे आणि ते माझ्याकडे आहे. काहीजणांनी विसंगती घडविण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही, असे वक्तव्य करत त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.