पुणे : काही दिवसांपुर्वीच भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. खडसेंनंतर कोण ? असा प्रश्न आता विचारला जात आहे. यातच आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे जाहीर कौतुक केल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
शरद पवार हे आपले तडकाफडकी निर्णय, संकटाच्या काळातील दौरे यासाठी ओळखले जातात. त्यांच्या याच कामाचे कौतुक पंकजा मुंडे यांनी ट्विट करत केले आहे. कोरोनाच्या परिस्थितीत इतके दौरे, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी शरद पवार यांचे जाहीर कौतुक केले आहे.
ऊसतोड कामगारांच्या संपाचा तिढा सोडवण्यासाठी पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला पंकजा मुंडे उपस्थित होत्या.
@PawarSpeaks hats off … कोरोना च्या परिस्थितीत इतका दौरा , आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिना चे अप्रूप वाटले … पक्ष ,विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तर कष्ट करणाऱ्या विषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबानी शिकवले आहे
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) October 27, 2020
पंकजा मुंडे यांनी ट्विट केले की, पवारसाहेब, हॅट्स ऑफ, कोरोनाच्या परिस्थितीत इतका दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटते. पक्ष ,विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तर कष्ट करणाऱ्यांविषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबानी शिकवले आहे. दरम्यान, दोनच दिवसांपुर्वी दसरा मेळाव्यात देखील पंकजा मुंडे यांनी शरद पवारांचाही उल्लेख केला. आता या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.