झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात अनेक कलाकार प्रमोशनसाठी येत असतात. अनेकदा कलाकार केवळ भेट देण्यासाठी देखील या कार्यक्रमात येत असतात. मराठी चित्रपटातील अनेक कलाकार आणि बॉलिवूडमधील कलाकार देखील या कार्यक्रमात हजेरी लावत असतात. नुकतेच विविध राजकीय नेत्यांनी चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यामध्ये भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजप खासदार सुजय विखे यांचा समावेश आहे. या सर्वांनी या कार्यक्रमात हजेरी लावत कार्यक्रमाची शोभा वाढवत गप्पा मारल्या.
या कार्यक्रमात सगळ्यात महत्वाची आणि चकित करणारी गोष्ट म्हणजे यावेळी मंचावर पवार आणि विखे कुटुंब एकत्र पाहायला मिळाले. पवार आणि विखे कुटुंबामध्ये विस्तवही जात नाही. राजकारणात दोघेही एकमेकांना धोबीपछाड देण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. पण या कार्यक्रमात एकाच मंचावर येऊन त्यांनी सर्वांना धक्का दिला. यावेळी मंचावर भाजप खासदार सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे देखील उपस्थित होत्या. त्याचबरोबर पंकजा मुंडे यांनी आपले पती अमित पालवे यांच्यासह या मंचासह हजेरी लावली होती. यावेळी विविध विषयावर भाष्य करत त्यांनी वातावरण मजेशीर करण्याचा प्रयत्न केला. यावेळी राजकीय चर्चा देखील झाली.
खेळामधून राजकीय निशाणा
या कार्यक्रमात हजर असलेल्या जोडप्यांमध्ये एक रिंगचा खेळ देखील खेळवण्यात आला. यामध्ये घड्याळ देखील ठेवण्यात आले होते. महत्त्वाचे आणि मजेशीर म्हणजे यावेळी खेळात पंकजा मुंडे आणि त्यांचे पती अमित पालवे यांच्याबरोबर सुजय आणि धनश्री विखे यांची रिंग देखील घड्याळावर पडली. त्यामुळे या दोघांचा नेमका निशाणा कुठे होता याची चर्चा सुरु झाली. याचवेळी या खेळामध्ये आणि चर्चेत पंकजा मुंडे यांनी रोहित पवार यांना टोलादेखील लगावला.
यावेळी पंकजा यांनी तुम्ही माझ्या घरातल्या सगळ्या व्यक्ती नका हो फोडू, असा टोला पंकजा मुंडे यांनी रोहित पवारांना लगावला. धनंजय मुंडे यांच्यावर पंकजांचा रोख होता हे महाराष्ट्राला वेगळे सांगण्याची गरज नाही. पंकजा मुंडे यांनी सुजयची बायको आणि माझा नवरा यांना फोडण्याचं काम रोहित करत आहेत असा टोला मारल्यानंतर रोहित पवार यांनीदेखील पंकजा यांना प्रत्युत्तर दिले. घरच्यांना माहिती असतं आपल्या माणसांसाठी काय चांगलं आहे, असे उत्तर देत त्यांनी पंकजा मुंडे यांना देखील टोला लगावला.