मुंबई : मनसुख हिरेन आणि सचिन वाझे प्रकरणाचा केंद्रीय तपास यंत्रणा तपास (NIA) करत आहे. या प्रकरणांशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्तींची एनआयएकडून सखोल चौकशी सुरु असून, आत्तापर्यंत केलेल्या चौकशीमधून अनेक धक्कादायक खुलासे उघड झाले आहेत.
दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची आता एनआयएकडून चौकशी होण्याची शक्यता आहे. परमबीर सिंग हे आज सकाळी एनआयएच्या कार्यालयात दाखल झाले आहे. तिथे ते जबाब नोंदवणार असून, अँटलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण तसेच वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दिलेल्या विशेष अधिकारांबद्दल एनआयएकडून त्यांची चौकशी होणार आहे.
परमबीर सिंग यांनी, त्यांच्या बदलीनंतर काहीच दिवसांनी, मुख्यमंत्री कार्यालयाला एक पात्र पाठवून, त्यात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांच्यावर केलेल्या या गंभीर आरोपांमुळे, त्यांच्या चौकशीची आणि राजीनाम्याची मागणी आक्रमकपणे होऊ लागली होती.
यातच सोमवारी मुंबई हायकोर्टाने ऍड.जयश्री पाटील यांच्या, परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या वसुलीच्या आरोपांच्या संबंधित रिट याचिकेवर सुनावणी करताना, अनिल देशमुखांच्या प्राथमिक सीबीआय चौकशीचे आदेश दिले. यानंतर काल नैतिक जबाबदारी स्वीकारून अनिल देशमुखांनी राजीनामा दिला आहे.
Mumbai: Former Mumbai Police Commissioner Param Bir Singh arrives at the NIA office, in connection with the Antilia bomb scare case pic.twitter.com/qrUdulVzAj
— ANI (@ANI) April 7, 2021
दुसरीकडे मुंबई पोलीस आयुक्तांच्या एका अहवालामुळेही परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सचिन वाझे पोलीस खात्यात पुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास परमबीर सिंग यांनी सचिन वाझेंकडे सोपवल्याचे या अहवालात म्हटले आहे. तसेच महत्त्वाच्या प्रकरणात मंत्र्यांना ब्रिफिंग करताना सचिन वाझे हे परमबीर सिंग यांच्यासोबत असायचे अशी माहितीही समोर आली आहे.