कोव्हॅक्सिन ही लस हैदराबादची कंपनी भारत बायोटेकने आयसीएमआरच्या सहकार्याने बनविली आहे. यासाठी पुण्यातील एनआयव्हीने कोरोनाचा स्ट्रेन उपलब्ध करून दिला होता. पटना एम्स (AIIMS-Patna) मध्ये या औषधाच्या चाचणीसाठी हॉस्पिटलने निवडलेल्या 10 जणांवर कोव्हॅक्सिनची चाचणी करण्यात आली आहे, असे ऑल इंडिया रेडिओने म्हटले आहे. यानुसार कोरोनाच्या या लसीचा पहिला डोस या रुग्णांना देण्यात आला असून यावर निरिक्षणे नोंदविण्यात येत आहेत. यानंतर 14 दिवसांच्या फरकाने दुसरा डोस दिला जाणार आहे.
भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा इल्ला यांनी टाईम्स नाऊला सांगितले की, SARS-CoV-2 विषाणूविरोधात कोव्हॉक्सिन परिणामकारक ठरण्याचा विश्वास आहे. भारत बायोटेक (Bharat Biotech) 200 दशलक्ष लसी बनविण्याच्या तयारीला लागली आहे. ही कोव्हॅक्सिन लस हैदराबादच्या जिनोमी व्हॅलीतील प्रकल्पामध्ये बनविण्यात येत आहे. प्राण्यांवर या लसीचे चांगले परिणाम दिसून आले आहेत.