नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मंत्रिमंडळाचा पहिला विस्तारात महाराष्ट्रातील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाचा हा विस्तार पुढच्या आठवड्यात होणार आहे.
भाजपाच्या सूत्रांनुसार मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार येत्या मंगळवारी होण्याची शक्यता आहे. पाच राज्यांतील विधानसभेची निवडणूक डोळ्यापुढे ठेवून हा विस्तार केला जाणार आहे. यूपीतून तीन-चार चेहऱ्यांना स्थान दिले जाणार आहे. उत्तराखंडमधून राज्यसभेचे खासदार आणि भाजपा च्या मीडिया विभागाचे प्रमुख अनिल बलूनी यांनाही जागा मिळणार आहे.
महाराष्ट्रातून दोन नेत्यांच्या नावांचीसुद्धा चर्चा रंगली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि माजी महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्या नावाची जोरदार चर्चा सरू आहे. याशिवाय कॉंग्रेस सोडून भाजपात गेलेले ज्योतिरादित्य सिंधिया, आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, ओडिशामधून बैजयंत पांडा यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची चर्चा आहे.
तसेच मागच्या वर्षी मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकार पाडण्यात महत्त्वाची भूमिका निभावणारे राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य सिंधिया केंद्रात सरकार आल्यापासून मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा करीत आहेत. त्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. राज्यातील राजकीय क्षेत्रातही या सर्व घटनांकडे बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
रेल्वेसाठी सिंधियांचे नाव
सिंधिया यांना रेल्वे मंत्रालय मिळण्याची शक्यता आहे. सिंधिया यांना भाजपामध्ये येऊन १५ महिने झाले आहेत. भाजपा आता त्यांना दिलेले वचन पूर्ण करणार आहे. मोदी हे ज्योतिरादित्य यांना कॅबिनेट मंत्रिपद देतील. मनमोहन सरकारमध्ये त्यांनी आपल्या कामाच्या जोरावर एक ऍक्टिव्ह मंत्र्याची प्रतिमा निर्माण केली होती. त्यांच्या या प्रतिमेचा फायदा भाजपाला होऊ शकतो.