मुंबई : अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या संकटात अडकला आहे. शासनाकडे मदतीची अपेक्षा केली जात आहे. यातच आता शेतकऱ्याला संकटकाळात काहीसा दिलासा देण्यासाठी ऊर्जामंत्र्यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. येत्या रब्बी हंगामात प्रामुख्याने कृषिपंपांना अखंडित वीजपुरवठा होईल, अशी ग्वाही राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली आहे.
ऊर्जामंत्री पदाचा पदभार स्विकारल्यानंतर महावितरण व महानिर्मिती या कंपन्यांचे मुख्यालय असलेल्या मुंबई येथील प्रकाशगडला ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी पहिल्यांदा भेट दिली. या भेटी दरम्यान प्रकाशगड येथे आयोजित बैठकीत परतीच्या पावसामुळे राज्याच्या काही भागात झालेल्या वीजयंत्रणेच्या नुकसानीचा आढावा तसेच राज्यभरातील वीजपुरवठ्याची स्थिती तसेच इतर विविध मुद्द्यांवर बैठक घेतली.
नितीन राऊत म्हणाले की, राज्याचे वीजक्षेत्र सध्या प्रतिकूल परिस्थितीत विविध संकटांना सामोरे जात असले तरी सुरळीत वीजपुरवठा आणि ग्राहकसेवेला सर्वोच्च प्राधान्य देत त्यात कोणत्याही प्रकारची तडजोड होणार नाही याबाबत कायम दक्षता घ्यावी. कीकडे महसुलात घट होताना दुसरीकडे ‘निसर्ग’ चक्रीवादळ, अवकाळी मुसळधार पाऊस व परतीच्या पावसाची अतिवृष्टी यामुळे यंदा राज्यभरातील वीजयंत्रणेला मोठे तडाखे बसले आहे. मात्र, या प्रतिकूल परिस्थितीतही वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा व दर्जेदार ग्राहकसेवा देणे ही प्राथमिक जबाबदारी व कर्तव्य आहे.
यासोबतच अतिवृष्टीमधील वीजयंत्रणेच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी किंवा साहित्याची आवश्यकता असल्यास ती त्वरीत पुरविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या रब्बी हंगामात प्रामुख्याने कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी अतिरिक्त स्वरुपात रोहित्र उपलब्ध करून ठेवावेत. राज्यभरात सर्व जिल्ह्यांमध्ये मागणीनुसार ऑईल व इतर साहित्याचा पुरेसा पुरवठा करण्यात येत असल्याचे नितीन राऊत यांनी सांगितले.