भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झालं. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अधिकृत घोषणा केली. एकनाथ खडसे यांनी भाजपचा त्याग केला. शुक्रवारी दुपारी दोन वाजता खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं.
तसेच खडसे यांच्यासोबत माजी मंत्री प्रकाश मेहता देखील भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा होत्या. मात्र खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेशाचा निर्णय प्रकाश मेहतांना आवडलेला नाही. एकवेळ मरण पत्करेन पण भाजप सोडणार नाही, असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला आहे.
“पक्षात कोणतेही निर्णय एक व्यक्ती घेत नाही. एका व्यक्तीला दोष देऊन आपण पळवाट काढावी हे योग्य नाही. पक्षाच्या विचारानुसार काम करत असताना मतभेद असतात मात्र मनभेद नसावेत. कोणतेही कारण देऊन पक्षावर दोष देणे योग्य नाही असं मला वाटतं”, असं खडसेंच्या राजीनाम्यानंतर प्रकाश मेहता म्हणाले.
ते म्हणाले, “माझे प्रश्न असू शकतात. नाराजी असू शकत नाही. माझ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळत असल्याने आणि भविष्यात जरी नाही आले तरी पक्षाच्या विचारावर कधीच त्रास होणार नाही. मी भाजप सोडून कुठेही जाणार नाही. एकवेळ मरण पत्करेन पण भाजप सोडणार नाही”.
“भारतीय जनता पार्टीच्या उभारणीमध्ये खडसेंचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी आज सुद्धा पक्षात राहून काम करावं अशी माझी इच्छा आहे. मात्र खडसेंनी त्यांचा निर्णय घेतला आहे. त्यांना आमच्याकडून शुभेच्छा”, असंही मेहता म्हणाले.