मुंबई : पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाचा आमदार चेतन तुपे यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शहराध्यक्षपदाची नियुक्ती जाहीर केली आहे. पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी माजी महापौर प्रशांत जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जगताप यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे.
पुढील काही महिन्यात शहरातील महापालिका निवडणुका पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर ही निवड करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने नव्या चेहऱ्याला संधी दिली.
प्रशांत जगताप यांनी महापौर, पीएमपीएल संचालक असे अनेक पदे भूषविली आहे. पुणे महापालिकेत जवळपास २१ वर्षांपासून त्यांना पालिकेतील कामाचा अनुभव आहे.
प्रशांत जगताप हे 2016-17 मध्ये पुण्याचे महापौर राहिले आहेत. जगताप हे सलग तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. 2012 मध्ये ते पीएमपीचे संचालक देखील होते. विशेष म्हणजे 2017 तच्या महापालिका निवडणुकीत जगताप आणि त्यांच्या आई रत्नप्रभा जगताप हे दोघेही एकाच प्रभागातून निवडून आले आहेत.