नाशिक : एकीकडे करोनाच्या विळख्यात महाराष्ट्र राज्य सापडले असताना, दुसरीकडे आज नाशिकमध्ये हृदय पिळवटून टाकणारी एक वाईट घटना, महापालिकेच्या डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयात घडली.
नाशिकमध्ये आज दुपारी १२ च्या सुमारास, डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या आवारात असलेल्या एका मोठ्या ऑक्सिजन टाकीतून, प्रचंड प्रमाणात वायू गळती होऊन, तब्बल २२ रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला आहे. दोन ते अडीच तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही वायू गळती थांबवण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले आहे.
दरम्यान, या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. “ऑक्सिजन टँक लीक झाल्यामुळे नाशिकमधील रुग्णालयात घडलेली घटना ही हृदय पिळवटून टाकणारी आहे. यात जीवितहानी झाल्यानं मन हेलावलं आहे. दु:खाचा डोंगर कोसळलेल्या कुटुंबीयांचं सांत्वन,” अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
The tragedy at a hospital in Nashik because of oxygen tank leakage is heart-wrenching. Anguished by the loss of lives due to it. Condolences to the bereaved families in this sad hour.
— Narendra Modi (@narendramodi) April 21, 2021
तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही, या दुर्घटनेस जे कुणी जबाबदार असतील त्यांची गय केली जाणार नाही, पण या दुर्दैवी घटनेचे राजकारणही कुणी करू नये. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे!” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच, मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदतही त्यांनी जाहीर केली आहे.
आज सकाळच्या सुमारास डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या मोठ्या ऑक्सिजन टाकीचा कॉक नादुरुस्त असल्याने, त्यातून गळती सुरू झाली. ही गळती रोखण्यासाठी जेव्हा तंत्रज्ञ कारागीर दाखल झाले आणि दुरुस्तीचे काम सुरू झाले, त्याचवेळेस नादुरुस्त कॉक पूर्णपणे तुटला. त्यांनतर ऑक्सिजन टाकीतून मोठ्या प्रमाणात वायू गळती होऊन ही दुर्दैवी घटना घडली आहे.