पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले आहेत. सीरम इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक सायरस पुनावाला आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून निर्माण केली जाणारी लस अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. या लसीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आले आहेत.
अहमदाबादमधील झायडस कॅडिला, हैदराबादेतील भारत बायोटेक आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये निर्मिती केली जाणाऱ्या लसीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. ऑक्सफर्ड विद्यापीठ, अॅस्ट्रा झेनेका आणि सीरम इन्स्टिट्यूटद्वारे संयुक्तरित्या कोरोना लसीची निर्मिती सुरु आहे. तर लसीच्या वितरणाबाबत केंद्र सरकारनं आतापासूनच मोठी तयारी सुरु केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी नियोजित वेळेनुसार पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले. लोहगाव विमानतळावर उतरल्यानंतर त्यांनी थेट सिरम इन्स्टिट्यूट गाठले. मोदी यांचं सिरममध्ये आगमन होताच सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख आदर पुनावाला आणि त्यांच्या पत्नीने मोदींचे हातजोडून स्वागत केले. त्यानंतर मोदी यांनी लस निर्मितीच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी कॉन्फरन्स रुममध्ये जाऊन शास्त्रज्ञांशी संवाद साधला. लस कधीपर्यंत तयार होईल? ही लस किती परिणामकारक असेल? दिवसाला किती लसींची निर्मिती होऊ शकते? आदी विविध बाबींची त्यांनी यावेळी माहिती घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी तब्बल सव्वा तास या इन्स्टिट्यूटमध्ये होते. यावेळी त्यांनी संशोधकांच्या कामाची स्तुती करत त्यांना प्रोत्साहन दिल्याचंही समजतं.
सिरम इन्स्टिट्यूटमध्ये सध्या अॅस्ट्रा झेनेका लसीवर चाचणी सुरू आहे. सिरम संस्थेने अॅस्ट्रा झेनेका नावाच्या कंपनीकडून ही लस तयार करण्याचे हक्क खरेदी केले असून या लसीवरचं संशोधन अंतिम टप्प्यात आहे.
दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी कोरोनाची एक लस सरकारला अडीचशे रुपयांना दिली जाईल, असं जाहीर केलं आहे. तसंच एकूण लसीच्या 90 टक्के लस ही सुरुवातीला भारतीय नागरिकांना दिली जाईल, असंही पुनावाला यांनी स्पष्ट केलं आहे.