पुण्यातील कसबा मतदारसंघाच्या आमदार व माजी महापौर मुक्ता टिळक यांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटद्वारे ट्विट करत याबाबदल माहिती दिली आहे.
कोरोनाची लागण झाल्यानंतर आपल्या सर्वांनी दिलेले पाठबळ, सदिच्छा आणि शुभेच्छातून मी आणि माझी आई कोरोनामुक्त झालो. लोकमान्य टिळकांच्या जयंती दिवशीच संकटातून सुखरूपणे बाहेर पडलो. आता पुन्हा एकदा जोमाने कामाला सुरवात करत आहोत, अशी भावना त्यांनी ट्विटद्वारे व्यक्त केली आहे.
पुनःश्च हरी ओम!!
आज २३ जुलै लोकमान्य टिळकांची जयंती. आज मी आणि माझी आई आपणा सर्वांच्या सदिच्छा आणि शुभेच्छांमुळे कोरोनाच्या मोठ्या संकटातून सुखरूप पणे बाहेर पडलो आहोत.
पुन्हा एकदा जोमाने कामाला सुरुवात !!
— Mukta Tilak (@mukta_tilak) July 23, 2020
कोरोनाची लागण झाल्यानंतर गेल्या पंधरा दिवसांपासून आमदार टिळक उपचार घेत होत्या. काल त्या कोरोनामुक्त झाल्या. आमदार टिळक कसबा विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. कोरोनाचे मोठ्यासंख्येने रूग्ण सुरवातीपासूनच या मतदारसंघात आहेत.गेल्या चार महिन्यात कोरोनाशी मुकाबला करताना पुण्यातल्या अनेक राजकीय कार्यकर्त्यांना कोरोनाची लागण झाली.
आमदार टिळक यांच्याशिवाय महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार योगेश टिळेकर यांना कोरोनाची लागण झाली. महापालिकेतील अनेक नगरसेवक, पदाधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली शिवाय यांच्या संपर्कात आलेल्या अनेकांना क्वारंटाइन व्हावे लागले.