पुणे : पुणे महापालिकेत भाजपची सत्ता असली तरी, भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात तोडफोड केल्याप्रकरणी माजी आमदार योगेश टिळेकर, भाजपच्या नगरसेविका राणी भोसले, रंजना टिळेकर, वीरसेन जगताप, वैशाली कामठे, मनीषा कदम या नगरसेवकांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. 40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्याच्या दक्षिण भागाला सुरळीत पाणी मिळावे याकरिता स्वारगेट पाणीपुरवठा विभागात भाजपने आंदोलन केले. या दरम्यान, कार्यालयाची तोडफोड करण्यात आली तसेच अधिकाऱ्यांना दमबाजी करीत शिवीगाळही करण्यात आल्याचा प्रकार घडला.
कार्यकारी अभियंता अशित जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार स्वारगेट पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणणे त्याशिवाय सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आदी कलमांखाली या लोकप्रतिनिधींवर कारवाई केली आहे.
शहराच्या दक्षिण भागात असलेल्या कात्रज, कोंढवा, वानवडी आदी परिसराला वडगाव जलशुद्धीकरण केंद्रामधून पाणी पुरवठा केला जातो. परंतु, मागील काही महिन्यांपासून हा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. यासंदर्भात पाठपुरावा करून देखील प्रश्न सुटत नव्हता. म्हणून भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आंदोलन केले.