No Result
View All Result
कर्जत: कर्जत जामखेडचे राजकीय वातावरण सध्या चांगलेच पेट घेऊ लागले आहे. आमदार रोहित पवार यांनी एका बाजूने कामांचा, सभांचा धडाका लावला आहे तर दुसऱ्या बाजून माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे हे देखील पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
काल संध्याकाळी सातच्या सुमारास कर्जत येथे भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी एक सभाही झाली. सभेला गर्दी जमलेली असतानाच पावसाचे दमदार आगमन झाले. तरीही दोन्ही नेत्यांनी सभा तशीच सुरू ठेवली. पाऊस सुरू असूनही दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्ते व समर्थकांची गर्दी कमी झाली नाही आणि बघता बघता जिल्हाभर या सभेची चर्चा सध्या रंगली आहे.
खासदार विखे यांनी नेहमीप्रमाणे कर्जत जामखेडमध्येदेखील राजकीय फटकेबाजी केली आहे. सध्या दिवाळीचा दिवाळीचा उत्साह आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्यासाठी विशेषत: कर्जत तालुक्यासाठी यंदा काळी दिवाळी आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीची भरपाई अजून दिली नाही. या सरकारला धडा शिकवण्यासाठी सज्ज रहा असे खासदार विखे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, कर्जत तालुक्यातील लोकांचे व्यक्ती स्वातंत्र्य टिकवायचे असेल, शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर प्राध्यापक राम शिंदे यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. खासदार विखे भाषण करत असताना अचानक पावसाचे आगमन झाले.
यावर खासदार विखे म्हणाले की, आज पावसामध्ये सभा घेणाऱ्यांमध्ये माझाही नंबर लागून गेला आहे. या सभेच्या माध्यमांतून गोदड महाराजांचा आशीर्वाद आम्हाला दोघांना मिळाला आहे. आगामी काळात सुखद घटना घडणार आहेत. पावसाच्या सभेत नंबर लागला, असे सांगत त्यांनी शरद पवारांच्या पावसातील सभेची आठवण विरोधकांना करून देत कोपरखळी मारली.
यावेळी प्राध्यपक राम शिंदे म्हणाले, मला दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच जाहीर सभेत बोलायचे होते. पण पाऊस आला. मात्र हा पाऊस आवश्यक होता. महावितरण प्रशासनामुळे शेतीला पाणी मिळत नाही. त्यामुळे पिके सुकून चालली होती. अशात आलेला हा पाऊस शेतकऱ्यांसाठीनक्कीच आशादायी ठरणारा आहे. कर्जत जामखेड मतदार संघात जलयुक्त शिवार व रस्त्याची कामे करूनही मला निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले, असे म्हणत त्यांनी आपले मनातील शल्य व्यक्त केले.
No Result
View All Result