मुंबई : अँटिलिया स्फोटकं आणि सचिन वाझे प्रकरणानंतर घडलेल्या एकामागोमाग एक घटनांमध्ये फोन टॅपिंगचा प्रकार देखील समोर आला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे संभाषणाचा डेटा असल्याचा दावा केल्यानंतर महाविकास आघाडीने आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांवर फोन टॅपिंगचा आरोप केला होता. आता भाजप नेत्याने शुक्ला यांनी सीबीआय चौकशीत अनेक नेत्यांची नावे उघड केल्याचा दावा केला आहे.
अनेक नेत्यांचे फोन टॅप केल्याचे आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर करण्यात आले आहे. याप्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी सायबर पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास शुक्लांना समन्समध्ये सांगण्यात आले होते. मात्र रश्मी शुक्ला ह्या कोरोनाचे कारण देत चौकशीसाठी उपस्थित राहिल्या नाहीत. आता भाजप नेत्याने ट्विटने करत मोठा दावा केला आहे.
आयपीएस रश्मी शुक्ला यांनी हैदराबाद मध्ये CBI चौकशीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यामध्ये दोन अनिल, त्यांचे चेलेचपाटे आणि एका बड्या नेत्याचे नाव आहे. राज्य सरकारने शुक्ला यांची चौकशी करण्यापूर्वी बाईंनी त्यांचा कार्यक्रम उरकून टाकला आहे.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 28, 2021
रश्मी शुक्ला यांनी सीबीआय चौकशीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत, तसेच अनेक नेत्यांची नावे घेतल्याचा दावा, भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केला आहे.
आयपीएस रश्मी शुक्ला यांनी हैदराबाद मध्ये CBI चौकशीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यामध्ये दोन अनिल, त्यांचे चेलेचपाटे आणि एका बड्या नेत्याचे नाव आहे. राज्य सरकारने शुक्ला यांची चौकशी करण्यापूर्वी बाईंनी त्यांचा कार्यक्रम उरकून टाकला आहे, असे खळबळजनक ट्विट भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केले आहे. आता, हा बडा नेता कोण ? याची चर्चा सुरू झाली आहे.