पुणे: पुण्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. छत्री दुरुस्ती उपक्रम सुरू केला आहे. सामाजिक कार्यकर्त्या किरण मोघे यांच्या हस्ते काँग्रेस भवनात सोमवारी हा उपक्रम सुरू करण्यात आला. मोहन जोशी यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे पहिल्याच दिवशी उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद दिल्याचे सांगितले होते. मात्र या उपक्रमाची सोशल मिडीयावर चांगली चर्चा होताना दिसत आहे.
शहर काँग्रेसने घेतलेल्या छत्री दुरुस्ती शिबिरात चक्क भाजपने वाटलेली छत्री दुरुस्तीसाठी आली आहे. त्यामुळे केंद्रात या दोन्ही पक्षात रोज आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्याने रोजच राजकारण तापत असले तरी, पुणेकरांना थंडीचा अनुभव देणाऱ्या या पावसाळ्यात भाजपच्या मदतीला काँग्रेस धावून आल्याची खुमासदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
हा उपक्रम हाती घेतल्यानंतर विरोधकांनी काँग्रेसवर टीका करायला सुरुवात केली होती. छत्री दुरुस्त करण्याऐवजी नवीन छत्री तरी द्यायची होती असे टोमणेही काँग्रेस नेत्यांना हाणण्यात आले. हा उपक्रम सुरू करणाऱ्या जोशी यांनी हीच कल्पना का सुचली याचं उत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटलंय की ‘सद्यस्थितीत केंद्र सरकारच्या धोरणांमुळे छोट्या व्यावसायिकांवर आर्थिक गंडांतर आले. त्यांना हातभार लावण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे.’