एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. खडसे यांच्या सूनबाई अर्थात भाजप खासदार रक्षा खडसे पक्षातच राहणार आहेत. मात्र त्यांच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांनाही राष्ट्रवादी प्रवेशाचे वेध लागल्याचे दिसत आहे.
“मला विधानसभा निवडणुकीत तिकीट दिल्यानंतरदेखील निवडणूकीत पराभूत करण्यासाठी प्रयत्न केला गेला. याची तक्रार पुराव्यासह करुनदेखील भाजप पक्षश्रेष्ठींनी कोणतीही दखल घेतली नव्हती. मी देखील सक्रिय राजकारणात असून आता भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीचे काम करणार आहे”, अशी प्रतिक्रिया भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या आणि जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी दिली
“ज्या व्यक्तीने 40 वर्ष पक्षनिष्ठेने काम केलं त्यांना हा निर्णय घेताना दुःख होणं स्वाभाविक आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत नाथाभाऊंनी उत्तर महाराष्ट्रात पक्ष उभा केला”, अशी भावना रोहिणी खडसे यांनी व्यक्त केली
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा अधिकृत राजीनामा दिला आहे. याबाबत त्यांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. . मात्र, त्यांच्या सूनबाई खासदार रक्षा खडसे यांनी राजीनामा दिलेला नाही. तर एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे या देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.