मुंबई : MPSC मार्फत २०१९ मध्ये घेतलेल्या परीक्षेत उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार अशा विविध पदांसाठी ४२० उमेदवारांची अंतिम यादी जाहीर झाली आहे. मात्र या उमेदवारांना अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही. अनाथ उमेदवारांच्या प्रश्नी ‘मॅट’ न्यायाधिकरणात हा विषय गेल्याने या सर्वच उमेदवारांच्या नियुक्त्या लटकल्या आहेत. त्यामुळं ‘मॅट’चा अंतिम निकाल लागेपर्यंत अनाथ उमेदवारांच्या नियुक्तीचा विषय स्थगित ठेवून उर्वरित उमेदवारांना नियुक्त्या देण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी आज सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्ता (मामा) भरणे यांच्याकडं केली. याबाबतचं निवेदन देखील भरणे यांना देण्यात आले. याचप्रश्नी मुख्यमंत्री कार्यालयाशीही माझा पाठपुरावा सुरू असल्याचे भरणे यांनी सांगितले.
तसंच गतवर्षी तलाठी पदासाठी घेतलेल्या परीक्षेत अंतिम निवड झालेल्या खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) घटकातील उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याच्या कालावधीच्या नियमात सुधारणा होऊन त्यांना नियुक्त्या देण्याचीही मागणीही यावेळी रोहित पवार यांनी केली. या दोन्ही विषयांवर सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन यावेळी राज्यमंत्री भरणे यांनी दिले असल्याचे रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडियाद्वारे म्हंटले आहे.
जनावरांच्या बाजाराबाबत देखील चर्चा
लॉक डाऊन झाल्यापासून राज्यात जनावरांचा बाजार बंद आहे. त्यामुळं जनावरांची खरेदी-विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होतेय. ती टाळण्यासाठी जनावरांचा बाजार सुरू करावा अशी मागणी यावेळी रोहित पवार यांच्याकडून करण्यात आली.
जनावरांमध्ये रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन लसीकरणाची मोहीमही हाती घ्यावी अशी मागणीही यावेळी मंत्री भरणे यांच्याकडे करण्यात आली. यावर सकारात्मक पद्धतीने विचार करू असे भरणे यांनी सांगितल्याचे रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.
शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी जनावरांचा बाजार सुरू करावा व त्यांच्यात रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन जनावरांचं लसीकरण करण्याची मागणी राज्यमंत्री @bharanemamaNCP मामांकडं केली.त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. pic.twitter.com/tt5Kxf0ZOV
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 24, 2020