मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काल 70वा वाढदिवस साजरा करण्यात आला यानिमित्त देशभरातील युवकांनी बेरोजगार दिवस साजरा करून त्यांच्याविरोधात सोशल मीडियावर हॅशटॅग आणि मीम व्हायरल होत होती यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाष्य केले आहे.
“देशाच्या पंतप्रधानांच्या जन्मदिनी त्यांच्याविरोधात हॅशटॅग चालवणे किंवा मीम वापरणे आपल्या भारतीय संस्कृतीला साजेसे नसून एकप्रकारे देशाच्या पंतप्रधानपदाचा अवमानच आहे” अशा भावना रोहित पवार यांनी फेसबुकवरुन व्यक्त केल्या आहेत.
सोशल मीडियावर हॅशटॅग चालवणारे तसेच मीम वापरणारे हे ट्रोलर्स नसून वास्तविक जीवनात बेरोजगारीच्या विळख्यात अडकलेली युवा पिढी होती. परंतु काल जे समाज माध्यमांवर घडलं ते चूकच आहे. पण यातून बेरोजगारी हा देशातील युवकांच्या समोरचा मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळे युवकांचे नैराश्य वाढलेलं दिसून आलं.” असं रोहित पवार म्हणतात.
“जागतिक कामगार संघटनेनुसार कोरोना काळात जवळपासस 41 लाख युवकांचे रोजगार गेले आहेत. सीएमआयच्या अहवालानुसार गेल्या वर्षभरात 2.1 कोटी लोकांचे पगारी जॉब गेले असून आतापर्यंतच्या इतिहासातील ही सर्वाधिक सुमार कामगिरी आहे. देशातील युवक शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत, त्यांना नोकऱ्या मात्र मिळत नाहीत, अशी दुर्दैवी परिस्थिती आज ओढवली आहे. दरवर्षी दीड कोटी युवक हे देशाच्या वर्कफोर्समध्ये दाखल होत असतात, परंतु 65 ते 75% युवकांना अपेक्षित कौशल्य नसल्याने डिग्री असूनही अपेक्षित रोजगार मिळत नाही” असं रोहित पवारांनी म्हटले आहे.