मुंबई – राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा झालेला दारूण पराभव आणि महाविकास आघाडीला मिळालेलं घवघवीत यश मिळाले. त्यामुळे महायुतीत अडगळीत पडलेल्या मित्र पक्षांनी नवी मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीय समाज पार्टीचे (रासप) अध्यक्ष महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चेस उधाण आलं आहे.
नुकत्याच झालेल्या विधानपरिषदांच्या निवडणुका, त्यात भाजपला आलेलं अपयश आणि तीन पक्षांच्या आघाडीला मिळालेलं यश. या पार्श्वभूमीवर जानकर यांच्या या भेटीकडे पाहिले जात आहे. आगामी काळातही या तिन्ही पक्षांनी एकत्र निवडणुका लढवल्या तर ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंतच्या निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागणार असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे जानकर हे नव्याने राजकीय समीकरण जुळवण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे
मात्र, शरद पवार आणि अजित पवार यांची घेतलेली ही भेट साखर कारखान्याच्या प्रश्नाशी संबंधित असल्याचं जानकर सांगत असले तरी जानकर हे लवकरच महाआघाडीत सामिल होण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान महादेव जानकर यांनी 3 तारखेला मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात शरद पवार आणि अजित पवार यांची भेट घेतली होती. या तिन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास खलबतं झाल्याचं सांगण्यात येतं. जानकर यांनी ही राजकीय भेट नसल्याचं जाहीर केलं आहे.