मुंबई : महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आले आहेत. शिवसेनेचे उमेदवार सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांच्या अंगावर गुलाल पडला आहे. निवडणुकीच्या निकाल आधीच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विधान भवनाच्या परिसरात जल्लोष करण्यात आले होते.
विधान परिषद निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण केलं जाईल, महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना मत देण्याची भूमिका होती. शिवसेनेचे आमदार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात एकत्रित आहेत. शेवटचा निकाल आल्यानंतर या संदर्भातील प्रतिक्रिया देणं योग्य होईल, असं सचिन अहिर म्हणाले.
विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या उमा खापरे यांचा विजय झाला आहे. त्यांना 26 मते मिळवून त्या पहिल्यांदाच विधान परिषदेवर आता निवडून जाणार आहेत. महाविकास आघाडीतील पाच तर भाजपचे चार उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपकडून श्रीकांत भारतीय, प्रवीण दरेकर, राम शिंदे आणि उमा खापरे यांना प्रत्येकी 26 मते मिळाली असून ते आता विधान परिषदेवर निवडून जाणार आहेत. तर त्याचबरोबर शिवसेना, राष्ट्रवादीचा प्रत्येकी दोन्हीही उमेदवार विजयी झाले असून काॅंग्रेसचा एक उमेदवार निवडून आला आहे.
आता पर्यंत अजून भाजपकडून प्रसाद लाड आणि काॅंग्रेसकडून भाई जगताप यांच्यात जोरदार रंगत होती. यामध्ये प्रसाद लाड यांनी भाई जगताप यांच्यावर बाजी मारली आहे. शिवसेनेकडून सचिन अहिरे, आणि आमशा पाडवी तर राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे विजयी झाले आहेत. तर काॅंग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे हे देखील विजयी झाले आहेत.