मुंबई : विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी महाविकास आघाडीकडून 12 नावांची शिफारस राज्यापालांकडे करण्यात आली होती. मात्र अद्याप यावर शिक्कामोर्तब झालेला नाही. राज्यपाल यातील काही नावांवर आक्षेप देखील घेण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर आता रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राज्यपालांकडे 12 जणांची यादी सोपवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या यादीत अनेक नावे विशेष आहेत.
या यादीमध्ये निवृत्ती महाराज इंदुरीकरांपासून ते माजी क्रिकेटपटू झहीर खान यांच्या नावाचा समावेश आहे. राज्यपालांकडे इंदुरीकर महाराजांच्या नावाची शिफारस करण्यात आल्याने केल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. युवकांपासून ते वृद्धांपर्यंत इंदुरीकर महाराज लोकप्रिय आहेत. मात्र ते आपल्या वक्तव्यांमुळे अनेकदा वादात देखील अडकतात.
सदाभाऊ खोत यांनी राज्यपालांकडे सोपवलेल्या यादीमध्ये करंद अनासपुरे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. तात्याराव लहाने, निवृत्ती महाराज इंदोरीकर, क्रिकेटर झहीर खान, अमर हबीब, पोपटराव पवार, विठ्ठल वाघ, विश्वास पाटील, सत्यपाल महाराज, बुधाजीराव मुळीक आणि मंगलाताई बनसोडे यांची नावे सुचवण्यात आली आहेत.