मुंबई : मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आहे. मुंबई प्रत्येकाची आहे. मात्र तिला बदनाम करण्याचा हक्क कोणालाही नाही. सध्या कोणता पक्ष काय बोलतोय याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. सत्ता गेलेली मंडळी राज्याबद्दल काय बोलत आहेत, याची नोंद आम्ही ठेवत आहोत, अशा शब्दांत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.
या पोलिसांना नावं ठेवता, माफिया म्हणता, त्याच पोलिसांच्या संरक्षणात फिरता, अशा शब्दांत राऊत यांनी कंगनाला लक्ष्य केलं. तुम्ही ज्या अभिनेत्रीचं नाव घेताय, तिचा विषय आमच्यासाठी संपलेला आहे, असं म्हणत राऊत यांनी कंगनाचं नाव घेणं टाळले कंगनाच्या मागे कोणाचा हात आहे, हे सगळ्यांना माहीत असल्यासाचे राऊत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.
कायदा सुव्यवस्था राखणं म्हणजे नेमकं काय, असा सवाल उपस्थित करत त्यांनी केंद्र सरकारला थेट लक्ष्य केलं. ‘मुंबईत माजी नौदल अधिकाऱ्यावर हल्ला झाला. त्यांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी फोन केला. त्यांची विचारपूस केली. संरक्षणमंत्री यामध्ये फार रस घेत आहेत. उत्तर प्रदेशात कॅप्टनला गोळी घालण्यात आली होती. त्यावेळीही त्यांनी असाच फोन केला होता का?,’ असा प्रश्न राऊत यांनी विचारला.