अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस योग्य पद्धतीने करत असून, हा तपास सीबीआयकडे देण्याची आवश्यकता नाही ही भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वेळोवेळी मांडली आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरामध्ये संजय राऊत यांनी सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांबद्दल अजब दावा केला होता. त्यानंतर राजपूत कुटुंबीयांनी त्यांचा दावा खोडून काढला होता. या प्रकाराबाबत आता संजय राऊत यांनी घुमजाव केला आहे.
आम्हाला सुशांतच्या कुटुंबीयांइतकीच या प्रकरणाची काळजी आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली आहे. ते म्हणाले की, ‘मी असे म्हटले होते की सुशांतच्या कुटुंबीयांनी धीर धरणे आवश्यक आहे. पण कुणीतरी असे म्हणाले आहे की मी त्याच्या कुटुंबीयांना धमकावत आहे. हे धमकी कशी होऊ शकते? तुम्ही माझ्या बोलण्याचा असा चुकीचा अर्थ कसा काय लावू शकता? आम्हाला सुशांतच्या कुटुंबीयांइतकीच या प्रकरणाची काळजी आहे.’