सांगली : मागील काही दिवसात भाजपमधील काही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता अनेकजण शिवसेनेत इच्छुक असल्याचा दावा राज्याचे गृहराज्य मंत्री आणि शिवसेना नेते शंभुराज देसाई यांनी केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची वाढ होत आहे. आम्ही कुणालाही झटका देत नाही. अनेक नेत्यांना शिवसेनेत यायचं आहे. त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं आहे, असे शंभुराज देसाई यांनी म्हटले आहे.
राज्य सरकारकडून रात्री संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, दरेकरांनी चार दिवसांच्या वर्तमानपत्रातील बातम्या बघायला हव्या होत्या. यूरोपीयन देशात कोरोनाचा धोका वाढला आहे. त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी राज्यात नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. राज्यातील जनतेच्या हितासाठीचा हा निर्णय आहे, याचं भान विरोधी पक्षालाही असायला हवे, असे म्हणत त्यांनी दरेकरांवर निशाणा साधला.