शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसिद्ध झाला आहे. या मुलाखतीमध्ये शरद पवारांनी अनेक मुद्यांवर आपले मत मांडले आहे. यावेळी संजय राऊत यांनी शरद पवार यांना तुम्ही आघाडी सरकारचे हेड मास्टर कि रिमोट कंट्रोल आहात? असा प्रश्न विचारला यावर शरद पवार काय उत्तर देतील याची उत्सुकता सगळ्यांनाच होती मात्र शरद पवार यांनी आपण या दोघांपैकी काहीही नसल्याचं स्पष्ट केलं. तसेच अशा गोष्टी लोकशाहीत नसतात, असंही नमूद केलं.
शरद पवार म्हणाले, “मी आघाडी सरकारचा हेड मास्टरही नाही आणि रिमोट कंट्रोल देखील नाही. हेडमास्टर असला तर तो शाळेत असायला हवा. लोकशाहीत सरकार किंवा प्रशासन हे रिमोटने कधीही चालत नाही. जिथं लोकशाही नाही तिथंच रिमोट चालतं.”
. ‘मी राज्यातील सरकारचा हेडमास्तर असण्याचं काही कारण नाही. त्यासाठी आधी सरकारमध्ये असलं पाहिजे. मी सरकारमध्येच नसल्यानं तशी शक्यता नाही. रिमोट कंट्रोलचं म्हणाल तर सरकार किंवा प्रशासन हे कधी रिमोट कंट्रोलनं चालत नाही. लोकशाहीमध्ये तर नाहीच नाही,’ असं ते ठामपणे म्हणाले.
आपल्या देशात लोकशाही असल्याचं शरद पवार पुढे म्हणाले. रिमोट कंट्रोलबद्दल बोलताना त्यांनी रशियात घडलेल्या घडामोडींचा संदर्भ दिला. ‘रशियात पुतीन हे २०३६ पर्यंत अध्यक्ष राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. लोकशाही वगैरे त्यांनी बाजूलाच सारली आहे. अशा ठिकाणी रिमोटचा वापर होतो. आपलं सरकार हे लोकशाही सरकार आहे. इथे रिमोट चालत नाही,’ असं पवार यांनी म्हटलं.