मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे यूपीएचे अध्यक्ष होतील, अशा चर्चा वारंवार सुरू आहेत. अनेक नेत्यांकडून शरद पवार यूपीएचे अध्यक्ष व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली जात आहे. शिवसेनेकडून देखील अशी जोरदार मागणी केली जात आहे.
मात्र शरद पवार यांनी पुन्हा एकदा यासंदर्भात चर्चा फेटाळली आहे. माझ्याकडे युपीए अध्यक्ष होण्यासाठी वेळ किंवा तसा विचार नाही. अशा प्रकारच्या कोणत्याही प्रस्तावाचा प्रश्नच येत नाही, असे पवारांनी म्हटले आहे. ते न्यूज18 शी बोलत होते.
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार दिल्ली विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. त्याआधी यूपीए अध्यक्ष होण्याचं वृत्त फेटाळले आहे. याआधी देखील त्यांनी असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे म्हटले होते.
तर दुसरीकडे काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी देखील शरद पवारांना यूपीएच्या अध्यक्षपदामध्ये रस नसावा असे म्हटले आहे. यूपीएचे ध्यक्षपद म्हणजे पंतप्रधानपद नाही. आघाडीमध्ये अध्यक्ष नावाची कोणतीही संकल्पना नाही, असे चिदंबरम यांनी म्हटले आहे.