उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा दौऱ्याला सुरुवात केली आहे. शरद पवार यांनी तुळजापूरमधून आपल्या पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. त्यांनी काकांब्रा, लोहारा, सास्तुर, उमरगा या गावांचा दौरा केला आहे.
राष्ट्रवादीमधून बाहेर पडत भाजपमध्ये गेलेले आमदार राणाजगतिसिंह पाटील यांच्या तुळजापूर मतदारसंघातून त्यांनी दौऱ्याला सुरुवात केली. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी आमदार पाटील यांचे प्रतिस्पर्धी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना सोबत घेऊन दौरा केला.
गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. खासदार राजेनिंबाळकर आणि आमदार पाटील एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. त्यातच आता शरद पवारांनी राजेनिंबाळकर यांना तुळजापूरमध्ये दाखल होताच बोलवून घेतले व त्यांच्यासोबतच संपुर्ण दौरा केला. यावेळी पवारांनी अमित देशमुख यांची देखील भेट घेतली.