सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी दगड फेक केल्याची घटना समोर आली होती. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर पक्षांच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली होती. यावर आता राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी मराठे कधी पाठीमागून वार करत नाहीत समोरून वार करतात, असे म्हटले आहे.
शशिकांत शिंदे यांनी या प्रकाराला जबाबदार असलेल्यांना पोलिसांनी २४ तासाच्या आत अटक करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, मराठा समाजाच्या कालच्या आणि उद्याचा लढ्यात आम्ही सहभागी असू पण एकाच पक्षाला कोणी टार्गेट करणार असेल, तरी आम्ही देखील त्याच पद्धतीने उत्तर देऊ. हा प्रकार करणा-याला पोलिसांनी २४ तासांत अटक करावी. कोणी घडवून आणला? त्याच्या हेतूचा शोध लागला पाहिजे.
छत्रपती शिवराय यांच्या राजधानीत सच्च्या मावळा असे कृत्य कधी ही करणार नाही. त्यामुळे दगडफेक करणाऱ्या आरोपींचे कोणाकोणाशी संबंध आले? हा कट कुठे शिजला? याची पाळेमुळे पोलीस यंत्रणेने शोधली पाहिजेत, अशी मागणी शिंदे यांनी केली.
मराठी बांधवाच्या पाठिशी होतो, आहोत यापुढेही राहणार आहोत. मराठा समाज जो निर्णय घेईल त्यासोबत आम्ही राहू. मराठा बांधवांच्या नावावर राजकारण करणं थांबवा. ज्या तरुणांनी हे केलं त्यांच्यावर केसेस होतील. ज्यांनी हे केलं त्यांना उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहोत, असेही ते म्हणाले.