सातारा : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक झाल्याची घटना समोर आली होती. यानंतर राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे हे त्या दोन युवकांच्या घरी पोहोचत जाब विचारला होता. यावरून शशिकांत शिंदेवर निशाणा साधताना आण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी थेट शिंदे हे मराठा आहेत का हे तपासले पाहिजे, असे म्हणत टीका केली होती. या टीकेला आता शिंदेंनी प्रत्युत्तर दिले आहे.
मी 96 कुळी मराठा असून मी कोणाच्या आव्हानाला भीक घालत नाही. मराठा समाजाशी कधीही भावनिक होऊन राजकारण केले नाही. आंदोलनावेळी मराठा तरुण ज्यावेळी अडचणीत आला, त्यावेळी मी पुढाकार घेतला आहे, असे शिंदे म्हणाले.
शशिकांत शिंदे यांनी तरुणांना दमबाजी केल्याचा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला होता. यावर बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, मी कुणालाही दम दिला नाही. तर समजावून सांगण्यासाठी गेलो होते. त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांना विनंती केली, असे ते म्हणाले.
मराठा आरक्षणाचा निर्णय हा एका पक्षाने घेतलेला नाही. मुळात ते ज्या पक्षाचे समर्थन करतात. त्या पक्षांची धोरणे स्पष्ट व्हावीत. देवेंद्र फडणवीस असो किंवा त्यांचे नेते १०२ वी घटना दुरुस्ती त्यांनीच केली. कायदाही त्यांनीच केला. पुढे सरकार बदलल्यानंतर ते पुढे नेण्याचे काम आमच्या सरकारने केले. त्यांनी अभ्यास करावा. जनतेच्या भावनेशी खेळू नये, असेही ते म्हणाले.