राज्यात कोरोनाचा विळखा वाढत आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना सुरु केली असून यामध्ये मदत करण्याचे आव्हान त्यांनी नागरिकांना केले आहे. विविध सेवाभावी संस्था, उद्योजक असे विविध घटकातील नागरिक या मदतीसाठी पुढे येत आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे शिवसेनेचे गटनेते आणि नगरसेवक राहुल कलाटे यांनी गेल्या चार वर्षांतील ५ लाख १५ हजार १०० रूपयांचे मानधन मुख्यमंत्री सहायत्ता निधीस दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना कलाटे यांनी पाच लाखांचा धनादेश सुपूर्द केला आहे.
शिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले, ‘‘कोरोनाचा विळखा वाढत असताना कोरानायोद्ध्यांचे मनोबल वाढविण्याबरोबर, शहरपातळीवर सामाजिक भावनेने मदत करण्याचा प्रयत्न केला. सामाजिक भान आणि जाणिवेच्या दृष्टीने मदत केली आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानुसार गेल्या चार वर्षांच्या काळातील एकुण पाच लाख मानधन हे मुख्यमंत्री सहायता निधीस दिले आहे.’’
दरम्यान, कोरानाचा विळखा अधिक घट्ट होऊ लागल्यानंतर परिसरात धुरीकरण, नागरिकांना तसेच कोरोनायोद्धे असणारे आरोग्य कर्मचारी, पोलीस, डॉक्टरांना सॅनिटायजर, मास्कची कीट वाटप केले. तसेच कोरोनाबाधितांना उपचार मिळवून देण्यासाठी शिवसेनेचे गटनेते आणि नगरसेवक राहुल कलाटे हे प्रयत्नशील राहिले आहेत.