राज्य शासनाने गणेशोत्सव विसर्जनासाठी महापालिकांना काही निर्बंध घातले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जनासाठी गणेशभक्तांची गर्दी होऊ नये, या उदात्त हेतून पिंपरी-चिंचवड महापालिकेने नदीघाटावर कडेकोट प्रतिबंद घातले आहेत. हाच मुद्दा पकडून शिवसेनेने आंदोलनाचा निर्णय घेतला मात्र यावेळी सेनेची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले.
महापालिका प्रशासनावर आरोप करीत शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच सोमवारी (दि. 24) आंदोलन केले. मात्र, महापालिकेत पक्षाचे नेतृत्व करणारे गटनेते राहूल कलाटे यांनी आंदोलनाला बगल दिली.
याच दिवशी झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीला कलाटे उपस्थित होते. पण, आंदोलनाकडे फिरकलेही नाहीत. त्यामुळे कलाटे-बारणे गटबाजी चव्हाट्यावर आली असून त्याचा फटका शहर शिवसेनेला बसत आहे.
शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे हे पिंपरी-चिंचवड महापालिकेत पक्षाचे नेतृत्व करतात. त्यांच्या अनुपस्थितीत आंदोलन घेणे पक्षातील जबाबदार नेत्यांना शोभत नाही, असा सूर पक्षाच्या एका गटातून आवळला जात आहे. पक्षाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी कलाटे यांना आंदोलनाबाबत कळवलेच नव्हते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे नाराज कलाटे यांनी या आंदोलनापासून दूर राहणे पसंत केल्याचे समजते. याची दुसरी बाजू अशी की, जर कलाटे आंदोलनात सहभागी होत नाहीत, तर त्यांचा प्रशासनाच्या भूमिकेला पाठिंबा आहे की काय, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
शिवसेनेचे विद्यमान शहराध्यक्ष योगेश बाबर यांना शहरातील सर्व नेत्यांमध्ये समन्वय ठेवणे आणि सर्वांना सोबत घेऊन पक्षाची ताकद वाढविण्यात अपयश येताना दिसत आहे. शिवसेनेची ही परिस्थिती बदलली नाही, तर आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाची त्रेधातिरपीट उडेल, असे संकेत राजकीय जाणकारांनी वर्तवले आहेत.