पिंपरी चिंचवडच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खलबत होताना दिसत आहेत. पिंपरी चिंचवड भाजप शहर अध्यक्ष महेश लांडगे यांनी अंतर्गत कलहाना कंटाळून राजीनामा दिल्याची चर्चा होती मात्र अफवांवर विश्वास ठेऊ नका मी राजीनामा दिलेला नाही असे महेश लांडगे यांनी आपल्या सोशल मीडियावरून स्पष्ट केले आणि शहर भाजपमध्ये कसलाही कलह नसल्याचे चित्र तयार झाले.
त्यानंतर काल शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी भाजप आमदाराला धारेवर धरत त्यांच्या राजकीय आकसापोटी विकास कामे थांबल्याचे आरोप पत्रकार परिषद घेऊन केले त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत कुरघोड्या सुरु असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले.
काय म्हणाले कलाटे नेमकं
कलाटे म्हणाले की, महापालिकेला माझ्या प्रभागातून कोट्यावधी रुपयाचा कर मिळतो. त्या बदल्यात तेथील नागरिकांना पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणे ही माझी जबाबदारी आहे. परंतू, भाजप आमदारांच्या हट्टापाई स्थायी समितीने प्रभाग क्रमांक 25 मधील विकास कामांना अडथळा घालण्याचे काम त्याचे अनुयायी करीत आहेत. त्यामुळेच प्रभागातील रस्त्यांच्या कामाचे विषय आज स्थायी सभापतींनी फेटाळले आहेत.
अशा प्रकारे राजकीय आकसापोटी विकास कामे थांबवण्यात येत आहेत. त्यामुळे भाजपचा खरा चेहरा उघड झाला असून आमच्या कामांना विरोध का करताय याचा आमदार लक्ष्मण जगतापांनी लोकांसमोर जाहीर खुलासा करावा, असे आव्हान शिवसेना गटनेते राहूल कलाटे यांनी पत्रकार परिषदेतून केलं आहे. तसेच भोसरीतील इंद्रायणीनगर येथील रस्ते सिमेंट काॅंक्रीटच्या कामात गोंधळ झाल्याने चिंचवड आमदारांचे भाचे देखील ब्लॅकलिस्ट होणार असल्याचे कलाटे यांनी सांगितले.
कलाटे यांनी यावेळी जगताप यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आणि भाजपमधील अंतर्गत कुरघोड्यांमुळे विकास कामे रखडत असल्याचे जनतेच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे खरंच भाजप मध्ये अंतर्गत काही रस्सीखेच सुरु आहे का असा सवाल पिंपरी चिंचवडकरांसमोर उपस्थित झाला आहे.