मुंबई – शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. ईडीच्या या नोटीसवरुन संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ईडीच्या नोटीस आल्याच्या वृत्तावर एका वृत्तवाहिनीने संजय राऊत यांच्याकडे विचारणा केली. यावर राऊत म्हणाले की, ईडीची नोटीस आली आहे की नाही याबद्दल मला नेमकी माहिती नाही. मी बाहेर आता एका कार्यक्रमात आहे. मला घरी जाऊन पाहावे लागेल की नोटीस आली आहे की नाही. याबद्दल मी पत्रकार परिषद घेऊन जाहीर भूमिका मांडेन.
दरम्यान, शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीने छापा टाकून सरनाईक यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी नोटीस बजावली होती. यावरुन महाविकासघडीतील नेते भाजपवर चांगलेच संतापले होते. आता शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नीला पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने नोटीस बजावल्याचे समोर आले आहे. भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनाही काही दिवसांपूर्वी ईडीने नोटीस बजावली होती.