हिंगोली : स्वतःची मुदत ठेव मोडून औषधांसाठी 90 लाख लाख खासगी वितरणाला दिल्याने हिंगोलीतील कळमनुरी मतदारसंघाचे शिवसेना आमदार संतोष बांगर चर्चेत आले होते. आता संतोष बांगर हे एका कथित व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे चर्चेत आले आहेत. रुग्णवाहिका वेळेवर न पाठवल्याने भडकलेल्या बांगर यांनी थेट रुग्णवाहिका पेटवून देण्याचाच इशारा दिला.
20 मिनिटांत गाडी हजर न झाल्यास पेट्रोल टाकून फुकून देईल, असा इशाराच त्यांनी संबंधित व्यक्तीला फोनवरून दिला. त्यांची ही कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाची तब्येत बिघडल्याने रुग्णवाहिका मागविण्यात आली होती. मात्र तासंतास वाट पाहून देखील रुग्णवाहिकाच न आल्याने संतापलेल्या बागर यांनी संबंधित व्यक्तीला फोनवरूनच झापले. सोबतच, 20 मिनिटात गाडी न आल्यास पेट्रोल टाकून गाड्या फुकून टाकेल, असा सज्जड दमच भरला.
या प्रकाराबाबत बोलताना बांगर म्हणाले की, 5 वाजता रुग्णवाहिका मागवली पण 8 वाजेपर्यंतही रुग्णवाहिका न आल्याने मी संतप्त झालो, तसेच यानंतर असा प्रकार घडल्यास मी 100% रुग्णवाहिका जाळल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.