मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे. तुम्हाला जर हे जमणार नसेल तर पुन्हा फडणवीसांच्या हाती सत्ता द्या, मी आरक्षण मिळवून देईन, असा इशाराच आज उदयनराजेंनी राज्य सरकारला दिला आहे. उदयनराजेंच्या या वक्तव्यावर आता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दरेकर यांनी उदयनराजेंनी व्यक्त केलेले मत हे तर मराठा समाजाच्या मनातील भावना असल्याचे म्हटले आहे. प्रवीण दरेकर म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्या हातात सत्ता द्या. मराठा आरक्षणाची जबाबदारी मी घेतो, असे सांगून खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा समाजाच्या मनातील भावना बोलून दाखविली आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण मिळाले. त्यामुळेच मराठा समाजाच्या मनात ही भावना आहे, असेही दरेकर म्हणाले.
दरम्यान, आज उदयनराजे यांनी पत्रकार परिषद मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सरकारवर जोरदार निशाणा साधला. आज तुम्ही देवेंद्र फडणवीस जे आपल्याच पिढीतले आहेत त्यांनी मराठा आऱक्षण मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर तुम्ही सत्तेत आला तर त्यांचं काम पुढे न्या. उलट तुम्ही काहीतरी कारण सांगून अजूनही प्रश्न प्रलंबित ठेवला आहे, असे उदयनराजे म्हणाले.
मराठ्यांचे कैवारी म्हणवणाऱ्यांना ही उपमा किती शोभा देते?, असे म्हणत उदयनराजेंनी कोणत्याही नेत्याचे नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाddeणा साधला.