मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना असे दोन गट शिवसेनेत पडल्याने जोरदार टिका टिप्पणी केली जात आहे. आज बाळासाहेब ठाकरे यांची दहावी स्मृतीदिन असून त्यांना राज्यातील अनेक नेत्यांनी आदरांजली वाहली. यावरूनच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टिका केली.
बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी आज त्यांना आदरांजली वाहण्यासाठी शिवाजी पार्कवर शिवसैनिकांची गर्दी जमली आहे. यावेळी संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचेचे विचार घेऊन आम्ही सगळे पुढे जात आहे. बाळासाहेबांच्या विचारांची मशाल निष्ठावंतांच्याच हाती असू शकते. त्यांच्या जीवनात निष्ठेला अनन्यसाधारण महत्व होतं. त्यांचं तेज कुणाला हिरावून घेता येणार नाही. पण महाराष्ट्रात काही ढोंगी लोक सध्या स्वत: ला बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार म्हणवून घेत आहेत. असे लोक जास्त काळ टिकणार नाही. असा टोला राऊतांनी लगावला आहे.
दरम्यान, एक दिवसापुर्वी एकनाथ शिंदे यांनी देखील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं. त्यानंतर शिवसैनिकांकडून त्याठिकाणी गोमुत्र शिंपडण्यात आलं. त्यामुळे या दोन्ही गटामधील वाद अजूनही शांत झालेला दिसत नाही.